
झरेवाडी केंद्रशाळेतील ‘FLNAT’ परीक्षा केंद्रास वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट; कामकाजाची पाहणी व मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. २६ ): प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत नवसाक्षरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’च्या (FLNAT) कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, झरेवाडी (ता. जि. रत्नागिरी) या परीक्षा केंद्रास भेट देऊन मार्गदर्शन केले. या पाहणी दौऱ्यादरम्यान भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील प्रौढ शिक्षण विभागाचे अवर सचिव मा. श्री. राम निवास, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय (योजना), पुणे येथील शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, संबंधित उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांनी केंद्रावरील परीक्षा आयोजन, परीक्षार्थींची उपस्थिती, परीक्षा प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि उपलब्ध भौतिक सुविधांची बारकाईने पाहणी केली. परीक्षा नियोजनबद्ध, सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याबाबत त्यांनी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच परीक्षार्थींना सर्व आवश्यक सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
प्रौढ शिक्षण कार्यक्रमांतर्गत नवसाक्षर झालेल्या व्यक्तींना मूलभूत शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील वाचन, लेखन व संख्याज्ञान (FLNAT) कौशल्यांचे अचूक मूल्यमापन करणे, हा या चाचणीचा मुख्य उद्देश आहे. प्रौढ शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासन, शैक्षणिक यंत्रणा आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय आवश्यक असल्याचे या वेळी मान्यवरांनी स्पष्ट केले. झरेवाडी शाळेतील या भेटीमुळे परीक्षा प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीस मदत झाली आहे.




