आता विवाह प्रमाणपत्र थेट ‘डिजिलॉकर’वर उपलब्ध; राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई :- विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकांसाठी सोयीची करण्यासाठी राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता नागरिकांना विवाह प्रमाणपत्र थेट ‘डिजिलॉकर’वर (DigiLocker) पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. विभागाने विवाह नोंदणीसाठी वापरण्यात येणारी संगणक प्रणाली डिजिलॉकरशी यशस्वीरीत्या एकत्रित केली आहे, ज्यामुळे नागरिकांना अधिकृत आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र सहज उपलब्ध होणार आहे.

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामार्फत विशेष विवाह अधिनियम, १९५४ आणि इतर नियमांनुसार विवाहांची नोंदणी करून प्रमाणपत्रे तयार केली जातात. २७ मे २०२३ पासून विवाह नोंदणीची सर्व कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. विभागाचे सहमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकूण १ लाख ८ हजार २५८ विवाह प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये विशेष विवाह प्रक्रियेतील ८७ हजार ३२६ आणि पूर्वीच्या विवाह नोंदणीतील २० हजार ९३२ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. वर्षनिहाय आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ७,८८८, २०२४ मध्ये ३१,९३६, २०२५ मध्ये ३५,०९५ तर २०२६ मध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत ३३,३३९ प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत.

पूर्वी प्रमाणपत्राची प्रत मिळवण्यासाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असत, मात्र या नवीन डिजिटल सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षितपणे जतन करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button