
राज्यभरात ‘उल्लास नव भारत साक्षरता’ अंतर्गत FLNAT परीक्षा ; सुमारे ७ लाख असाक्षरांचा सहभाग
रत्नागिरी, दि. २६ ): केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमां’तर्गत (ULLAS Nav Bharat Saksharata Karyakram) वर्ष २०२५-२६ मधील ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’ (FLNAT) रविवार, २५ ऑक्टोबर रोजी राज्यभरात शांततेत आणि उत्साहात पार पडली. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील युडायस (UDISE) प्राप्त शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा एकूण नऊ माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे ७ लाख असाक्षरांनी उपस्थिती दर्शवली.
उत्तीर्ण नवसाक्षरांना पुढील शिक्षणाची संधी
या परीक्षेत विहित निकषांनुसार उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत एकत्रित प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान करण्यात येईल. तसेच, या परीक्षेतील यशामुळे नवसाक्षरांना पुढील शिक्षणाचा मार्ग खुला होणार असून त्यांना थेट इयत्ता ३ री, ५ वी, ८ वी, १० वी आणि १२ वीच्या परीक्षांना बसता येणार आहे.
जीवन कौशल्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट
सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे केवळ साक्षरता नव्हे, तर नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता, आर्थिक व कायदेविषयक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंब कल्याण यांसारखी महत्त्वाची जीवन कौशल्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांची पाहणी
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य व जिल्हास्तरावरून काटेकोर नियोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अवर सचिव राम बिलास मीना, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, सहाय्यक संचालक सतीश चौधरी व सहाय्यक योजना अधिकारी सचिन अनंत कवळस यांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
याशिवाय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक डॉ. नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ, शिक्षण संचालनालय (योजना) उपसंचालक डॉ. गणपत मोरे, उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ, उपशिक्षणाधिकारी (योजना) दैवशाला शिंदे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतला.
या परीक्षेसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय क्रीडा राज्यमंत्री मा. पंकज भोयर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल तसेच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या.
परीक्षेचे सुनियोजित आयोजन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, जिल्हास्तरीय अधिकारी तसेच या मोहिमेचा व्यापक प्रचार-प्रसार करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करून आभार मानले.



