रत्नागिरीच्या तीन मल्लांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

रत्नागिरी:
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मल्लांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदकांना गवसणी घालत जिल्ह्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या तिन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील आदर्श हायस्कूल कुरतडे या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केली. ५२ किलो वजन गटात सोहम खंडेराव पाटील याने तर ५७ किलो वजन गटात समर्थ संजय कुदळे याने सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही गुणवंत मल्लांना क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक मानसिंग कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​तसेच महात्मा गांधी विद्यालय उंबरे येथील राजवीर सतीश पवार या मल्लाने ३८ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राजवीर याला मार्गदर्शक मारुती गलांडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
​रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खेळाडूंच्या सरावासाठी आधुनिक ‘कुस्ती मॅट’ उपलब्ध करून दिल्या आहेत. मॅटवरील नियमित सरावामुळेच यंदाच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंना हे मोठे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया विजयी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

​राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सोहम पाटील, समर्थ कुदळे आणि राजवीर पवार या तिन्ही खेळाडूंचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कौतुक करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button