
दुष्काळाच्या उंबरठ्यावर रत्नागिरीला भाजपचा संजीवनी संदेश; श्रमदानातून रचला जल-संवर्धनाचा बंधारा!
पाणी आडवा, पाणी जिरवा - ही घोषणा नाही, तर जगण्याचा मंत्र!
रत्नागिरी, दि. २६ – एकीकडे भविष्यातील भीषण दुष्काळाचे सावट, दुसरीकडे खळाळून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी… हीच चिंता मनात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकर्त्यांनी आज राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा एक आदर्श घालून दिला. फावडे, घमेले हातात घेऊन, घोषणा नव्हे तर श्रमदान करत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ चा संदेश थेट कृतीतून दिला.
आज सोमवारी सकाळी ८ वाजताच काजरघाटीचा परिसर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने दणाणून गेला. काजरघाटी, पिलणकरवाडी स्टॉपवरून सर्वजण एकत्र येऊन पोमेंडी खुर्द - बौद्धवाडी पुलावर पोहोचले आणि खऱ्या अर्थाने युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. कोणी दगड रचत होता, कोणी माती टाकत होता. नेते, कार्यकर्ते, आणि गावकरी असा भेदच उरला नाही, सगळे एकाच ध्यासाने काम करत होते. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवायचा आणि जमिनीत जिरवायचा. हा फक्त बंधारा नाही, तर पुढच्या पिढीसाठी पाणी वाचवण्याची ही एक चळवळ आहे.
"पाणी हेच जीवन आहे. आज जर पाणी अडवले नाही, तर उद्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आम्ही सत्तेसाठी नाही, तर मातीसाठी आणि पाण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा बंधारा रत्नागिरीकरांसाठी आमची दिवाळी भेट सामाजिक संदेश आहे." - अशी भावना शहराध्यक्ष श्री. परशुराम (दादा) ढेकणे यांनी व्यक्त केली.
या सामाजिक कार्यात शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, निलेश आखाडे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, विक्रम जैन, अद्वैत कुलकर्णी, अजिंक्य केसरकर, राजू भाटलेकर, मोहन पटवर्धन, शेखर लेले, नितीन गांगण, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, निखिल घाग, गिरीधर पटवर्धन, आशिष मोरे, आयुष ढेकणे, प्रसाद बाष्ठे, दिलीप पटवर्धन, श्री तेरेदेसाई, सौरभ पवार, श्रीपाद पोकळे आदी. यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य ग्रामस्थांनी घाम गाळला. राजकीय पक्षाने असा सामाजिक संदेश देणे हे खरंच कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.




