
पिंपळी खुर्दमध्ये बंद घर फोडले; १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील मधलीवाडी, हनुमान मंदिर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राम शिवराम कदम (वय ७०, रा. पिंपळी खुर्द, मधलीवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ या कालावधीत ही घरफोडी झाली. कदम हे कुटुंबासह कल्याण येथे गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून लॉकरमधील सोन्याची साखळी, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीची गणेशमूर्ती, मोदक, पैजण आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (एकूण किंमत अंदाजे ५० हजार रुपये), १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.
या प्रकरणी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५४ वाजता चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.




