
गरजूंच्या आयुष्यात पुन्हा उमटला “आवाज” रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत श्रवणयंत्रांचे वाटप
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रुग्णालय,रत्नागिरी मधील कान, नाक व घसाशास्त्र विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी पाऊल उचलले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे श्रवणदोषामुळे संवाद आणि दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या उल्लेखनीय उपक्रमामागे कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सुनिता बागे यांचा विशेष पुढाकार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रुग्णांविषयीची संवेदनशिलता महत्त्वाची ठरली. आर्थिक परिस्थितीमुळे महागडी श्रवणयंत्रे घेणे शक्य नसलेल्या रुग्णांना ही सुविधा मोफत उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. बागे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे मा.अधिष्ठाता आणि प्रशासनाची साथ मिळाल्याने हा उपक्रम यशस्वीपणे प्रत्यक्षात आला.
श्रवणशक्ती कमी होणे ही केवळ वैद्यकीय समस्या नसून त्याचा परिणाम व्यक्तीच्या सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक जीवनावरही होतो. अनेक रुग्णांना कुटुंबियांशी संवाद साधताना अडचणी येतात, तर काही जण हळूहळू सामाजिक जीवनापासून दूर जातात. अशा परिस्थितीत योग्य श्रवणयंत्र मिळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात संवादाची नवी दारे उघडण्यासारखे आहे. ही गरज ओळखून डॉ. सुनिता बागे यांनी गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम पुढे नेला. रुग्णांची तपासणी, श्रवण चाचणी, श्रवणदोषाचे मूल्यांकन आणि त्यानुसार योग्य श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यामुळे हा उपक्रम केवळ मोफत श्रवणयंत्र वाटप इतकाच मर्यादित न राहता, रुग्णांना पुन्हा आत्मविश्वासाने संवाद साधता यावा आणि त्यांचे जीवनमान सुधारावे, या व्यापक उद्देशाने राबविण्यात आला आहे.
तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची (MJPJAY) जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. सुनिता बागे यांनी या योजनेचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले कार्य विशेष कौतुकास्पद ठरले आहे. योजनेच्या माध्यमातून पात्र रुग्णांना आवश्यक उपचार व सुविधा मिळवून देताना त्यांनी रुग्णांच्या गरजेला प्राधान्य दिले. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना श्रवणयंत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.
रुग्णांची गरज ओळखणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे,आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेणे आणि योजनेच्या माध्यमातून उपलब्ध सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे या त्यांच्या कार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. MJPJAY सारख्या महत्त्वाच्या शासकीय योजनेचा प्रभावीपणे वापर करून त्याचा प्रत्यक्ष लाभ गरजू रुग्णांना मिळवून देणे ही निश्चितच प्रशंसनिय बाब आहे.
या उपक्रमाच्या यशाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरीचे मा.अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. सुनिता बागे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. गरजू रुग्णांची अडचण ओळखून त्यांच्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणे, त्यासाठी पाठपुरावा करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बागे यांच्या प्रयत्नांमुळे कान, नाक व घसाशास्त्र विभागाच्या माध्यमातून रुग्णांना एक महत्त्वाची सुविधा मिळाली असून, अशा रुग्णहिताच्या उपक्रमांमुळे शासकीय रुग्णालयाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो असेही मा. अधिष्ठाता यांनी कौतुकाने सांगितले. दरम्यान, या उपक्रमासाठी रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल डॉ. सुनिता बागे यांनी मा. अधिष्ठाता यांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रशासनाकडून मिळालेले सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम यशस्वीपणे राबविता आला, असे त्यांनी नमूद केले. रुग्णांच्या हितासाठी काम करताना प्रशासन, डॉक्टर्स, ऑडिओलॉजिस्ट, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम शक्य झाल्याचे सांगत डॉ. बागे यांनी संबंधित सर्वांचे आभार व्यक्त केले.
श्रवणयंत्राच्या माध्यमातून आता कुटुंबियांशी अधिक सहज संवाद साधता येणार असून, दैनंदिन व्यवहारातही आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. तसेच संबंधित रुग्णांनी सदर उपक्रमाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. सुनीता बागे यांचे आभार मानले.




