
ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती; १.६० कोटींचा निधी मंजूर
आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; १० शाळांत व्हीआर लॅब, ५० अंगणवाड्यांना आधुनिक शैक्षणिक साहित्य

सावर्डे (प्रतिनिधी) : चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामीण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. जिल्हा परिषदांच्या १० प्राथमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) लॅब उभारण्यासाठी ७० लाख रुपये, तर ५० अंगणवाड्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ९० लाख रुपये, असा एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी कोयना भूकंप पुनर्वसन निधी २०२५-२६ अंतर्गत मंजूर झाला आहे. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली.
सावर्डे येथील आमदार निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात शैक्षणिक साहित्यवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
१० शाळांमध्ये व्हीआर लॅब
दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये व्हीआर लॅब उभारण्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सूर्यमाला, समुद्रतळ, ऐतिहासिक किल्ले आणि मानवी शरीराची अंतर्गत रचना यांसारख्या विषयांचा त्रिमितीय अनुभव घेता येणार आहे. विज्ञान, गणित, भूगोल आणि इतिहास यांसारखे विषय अधिक रंजक व सोप्या पद्धतीने समजून घेण्यास यामुळे मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढवून त्यांची आकलनशक्ती विकसित करण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत.
५० अंगणवाड्यांना आधुनिक शैक्षणिक साहित्य
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ५० अंगणवाड्यांसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत स्मार्ट अँड्रॉइड प्रणाली, डिजिटल शैक्षणिक कार्यक्रम, थ्रीडी पुस्तके, शैक्षणिक कार्ड्स, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह मॅट, संगीत यंत्रणा आणि अन्य आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. खेळ आणि कृतीच्या माध्यमातून बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आमदार शेखर निकम म्हणाले की, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवाधारित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. अंगणवाडीतील बालकांना लहानपणापासून शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. उपलब्ध करून दिलेल्या साहित्याचा शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक सुविधांमधील दरी कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे, हे आपले ध्येय असल्याचे निकम यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जयंत शेठ खताते, नितीन ठसाळे, गटशिक्षणाधिकारी निर्णय, देसाई, संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी परीट, अशोकभाई कदम, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, रमेश राणे, पंचायत समिती उपसभापती प्रफुल्ल बाईत, राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, मंगेश बांडागळे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.




