
रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण, लवकरच होणार उड्डाण; कसे असेल अत्याधुनिक टर्मिनल?
Ratnagiri Airport : कोकणच्या हवाई वाहतुकीच्या स्वप्नाला आता अधिक बळ मिळत असून, रत्नागिरी विमानतळाच्या विकासाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने उरकली जात आहेत. त्याचबरोबर विमानांच्या पार्किंगसाठी आवश्यक असलेल्या ॲप्रनचे (पार्किंग वे) काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत हे या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वारंवार विमानतळाला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार कंपन्यांकडून अधिक वेगाने आणि दर्जेदार काम करून घेतले जात आहे. टर्मिनल इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने आता प्रवासीसेवा, सुरक्षा यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर दिला जात आहे.
टर्मिनल इमारतीमधून प्रवाशांना थेट विमान धावपट्टीकडे (रनवे) जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने लवकरच सुरक्षाभिंत तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामांनंतर टर्मिनल बिल्डिंग आणि धावपट्टी यांच्यातील संपर्क सुलभ होणार असून, प्रवाशांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल.
पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
कोकणातील पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला बूस्टर डोस देण्यासाठी रत्नागिरी विमानतळ अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. विमानतळ पूर्णक्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी रत्नागिरीची थेट कनेक्टिव्हिटी प्रस्थापित होईल. यामुळे स्थानिक उद्योजकांना नवा बाजार उपलब्ध होईल तसेच कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नाईट लँडिंग सुविधेच्या कामांनाही गती
विमानतळाच्या धावपट्टीचे मजबुतीकरण आणि रात्रीच्यावेळी विमानांचे लँडिंग सुलभ व्हावे यासाठी नाईट लँडिंग सुविधेच्या कामांनाही गती देण्यात आली. संबंधित सर्व प्रशासकीय विभाग आणि कंत्राटदार संस्था उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अंतिम मंजुरी मिळवून विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.



