नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसळखोरांवर आता थेट कारवाईचा बडगा : ना. कदम


राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आणि अन्नात भेसळ करणार्‍यांविरोधात आता सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (एफडीए) तुकाराम मुंडे यांना कारवाईसाठी सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, भेसळखोरांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही पूर्णपणे फ्रीडम दिले आहे. तुम्हाला जितक्या कारवाया करायच्या आहेत तितक्या करा; आम्ही अजिबात आडवे येणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य योगेश कदम यांनी केले.
हॉटेल, उपाहारगृह आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. एखादे झुरळ आढळले तरी संबंधित आस्थापनाचा परवाना रद्द होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. सर्वसामान्य नागरिक हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यास उपयुक्त अन्न मिळाले पाहिजे. अन्नामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असता कामा नये, ही सरकारची भूमिका असल्याचे कदम यांनी सांगितले. अन्न भेसळीविरोधातील कारवाईला राजकीय हस्तक्षेपाचा अडथळा येणार नसल्याचा संदेश या वक्तव्यामुळे स्पष्ट झाला असून, आगामी काळात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button