राजापूर तालुक्यातील खिणगिणी परिसरात बिबट्याचा वावर


राजापूर तालुक्यातील खिणगिणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून दोन दिवसांपूर्वी बिबट्याने चार वर्षाच्या गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खिणगिणी कुणबीवाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खिणगिणी कुणबीवाडी येथील शेतकरी कृष्णा हरी डोंगरकर यांची गुरे रानात चरण्यासाठी गेली होती. गावातील जुन नवलाई देवी मंदिर, भातशीचे कुट परिसरात बिबट्याने डोंगरकर यांच्या चार वर्षाच्या गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय मृत झाली. घटनेची माहिती मिळताच मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये कृष्णा डोंगरकर यांचे सुमारे ३० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पंचनामा करताना रविंद्र डोंगरकर, दत्ताराम डोंगरकर, माजी सरपंच विजय पाध्ये, पोलीसपाटील अशोक डोंगरकर रमेश डोंगरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुरे चरण्यासाठी रानात सोडताना विशेष खबरदारी घेण्याची वेळ आली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button