भाजपच्या चिपळूण शहराची धुरा पुन्हा आशिष खातूंकडे!

नगरसेवक ते शहराध्यक्ष असा अनुभव; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून नियुक्तीची घोषणा

चिपळूण : भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण शहर मंडल अध्यक्षपदी मकरंद उर्फ आशिष चंद्रकांत खातू यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

आशिष खातू यांनी यापूर्वी चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून काम केले असून, भाजपच्या चिपळूण शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर पुन्हा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

चिपळूण शहरात भाजपची संघटना अधिक मजबूत करणे, बूथ स्तरापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे, वरिष्ठांकडून दिलेले कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे, ही प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच नागरिकांशी संपर्क वाढवून पक्षाचे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे.

शांत, संयमी आणि अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या आशिष खातू यांना नगरसेवक आणि शहराध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे चिपळूण शहरातील भाजपच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना आशिष खातू म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासह संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button