पाली येथे चोरीला गेलेल्या दुचाकीचा पोलिसांनी २४ तासात लावडा छडा


घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर पाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या चोरीचा छडा लावला दुचाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पाली पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचार्‍यांनी चातुर्याने तपास करत चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
पाली घडशीवाडी येथील सुमित्रा चाळ परिसरात राहणारे सचिन शिवाजी गोंधळी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच ०८ एव्ही ४२९२) ही दि. २० ऑगस्ट रोजी रात्री घरासमोर उभी केली होती. दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी पाली पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस दूरक्षत्राच तपासी अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर जाधव यांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांच्या सहकार्याने पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली.
तपासादरम्यान चोरीची दुचाकी दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हाडपिड येथील दत्तमंदिराजवळ देवगड-निपाणी रस्त्याच्या बाजूला उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुचाकी ताब्यात घेतली. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत दुचाकीचा शोध घेऊन मुद्देमाल ताब्यात घेतल्याबद्दल पाली पोलीस दूरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button