
महाड-दापोली मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक
१४ प्रवाशांसह चालक-वाहक जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली
महाड-दापोली राज्यमार्गावर कुरळा दिवेकरवाडी येथील वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन्ही बसमधील १४ प्रवाशांसह चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाडहून मंडणगडच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि मुंबईच्या दिशेने जाणारी दुसरी एसटी बस कुरळा दिवेकरवाडी येथील वळणावर आली असता दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की मंडणगडकडे जाणारी बस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली, तर दुसरी बस रस्त्याच्या कडेला घसरली.
वळणावर दोन्ही बसच्या चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी प्रवाशांसह चालक आणि वाहकांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. जखमींवर उपचार सुरू असतानाच इतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.
या अपघातामुळे महाड-दापोली मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. दोन बसची झालेली जोरदार धडक पाहता अपघाताची तीव्रता मोठी होती; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.




