
टोलच्या निकषांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हरताळ ? कोकणवासीयांच्या का पडणार खिशाला दुहेरी कात्री!
: मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच खारपाडा इथला टोलनाका सुरू करण्यात आला आता सुकेळी खिंडीतील टोलनाका सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. हे सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्ग विभागाने टोलनाके उभारताना अंतराच्या निकषाला हरताळ फासल्याचे पहायला मिळत आहे.
यामुळे कोकण वासियांच्या खिशाला दुहेरी भुर्दंड पडणार असल्याची बाब रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो कोकणवासीयांच्या खिशावर पडणारा दुहेरी टोलचा भार आता ऐरणीवर आला आहे. पळस्पे-इंदापूर मार्गावर अवघ्या सुमारे चाळीस किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि सुकेळी असे दोन टोल नाके उभारण्यात आल्याने वाहनचालकांना एकाच प्रवासात दोनदा टोल भरावा लागणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून दररोज हजारो नागरिक रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि विविध कामांसाठी कोकणात ये-जा करतात. त्याचबरोबर गणेशोत्सव, उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात लाखो वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. अशा परिस्थितीत अवघ्या चाळीस किलोमीटरच्या अंतरात दोनदा टोल आकारणे म्हणजे प्रवाशांच्या खिशावर अन्यायकारक आर्थिक बोजा टाकण्यासारखे आहे, अशी भावना वाहनचालकांमध्ये व्यक्त होत आहे.
या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लक्ष वेधले. तटकरे यांनी निवेदनात, टोल नाक्यांमध्ये किमान ६० किलोमीटरचे अंतर असावे, या निकषाकडे लक्ष वेधत पळस्पे-इंदापूर मार्गावरील टोल व्यवस्था जनहिताच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खारपाडा किंवा सुकेळी यापैकी एक टोल नाका तातडीने हटवावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्ण झालेले नसताना, प्रवाशांना टोल मात्र दुहेरी भरावा लागणार असल्याने नाराजी अधिक तीव्र झाली आहे. रस्ता पूर्ण नाही, सुविधा अपुऱ्या आहेत आणि त्यात कमी अंतरात दोन टोल, असा संतप्त सवाल कोकणवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर टोल व्यवस्थेचा फेरविचार करून दोन्ही टोल नाक्यांमधील अंतर किमान ६० किलोमीटर ठेवावे आणि प्रवाशांना दुहेरी टोलच्या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. कोकणातील लाखो नागरिक, व्यावसायिक, एसटी प्रवासी आणि वाहनचालकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला असून, केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.




