चिपळूणचे हायटेक बसस्थानक अद्याप अपूर्ण

परिवहन मंत्र्यांच्या पाहणीनंतरही कामाला अपेक्षित वेग नाही; चाकरमानी पुन्हा पावसात ताटकळण्याची शक्यता

चिपळूण : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असताना चिपळूणमधील बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप सुमारे ५० टक्के बाकी असल्याने प्रवाशांच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून ते वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे चित्र आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. चिपळूण हे कोकणातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असल्याने या काळात बसस्थानकावर मोठी गर्दी होते. मात्र, बसस्थानकाचे काम अपूर्ण राहिल्यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पहिल्या मजल्यावरील कार्यालय उभारणीच्या कामाची निविदाही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत गणेशोत्सवासाठी चिपळूणमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना बसची प्रतीक्षा करताना पावसात उभे राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतरही रखडलेल्या कामाला तातडीने गती देऊन गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा आता या कामाला किती वेग देतात, याकडे चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button