
गणपतीपुळेहून परतणाऱ्या भाविकांच्या सफारी कारला अपघात; दरीत कोसळून प्रवासी जखमी
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या सोलापूर येथील भाविकांच्या सफारी कारचा अपघात झाला. गणपतीपुळे–निवळी मार्गावरील तिवराड पोलिस चौकीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार सुमारे १० ते १५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील काही प्रवासी जखमी झाले असून त्यांची ओळख उशिरापर्यंत समजू शकली नव्हती.
माहितीनुसार, एमएच १३ डीटी ८३५३ क्रमांकाची सफारी कार सोलापूर येथील भाविकांना घेऊन गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आली होती. दर्शनानंतर परतीच्या प्रवासादरम्यान तिवराड पोलिस चौकीपुढे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन पडली.
अपघातामुळे वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढून मदत केली. या अपघातात प्रवाशांना दुखापती झाल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.




