
कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाची फेरतपासणी होणार
कोत्रेवाडी येथील घन कचरा प्रकल्प संदर्भात पुढील चार दिवसात मुख्याधिकारी यांना बैठक घ्यायला सांगतो. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांच्यासमोर माडा त्यानंतर सगळ्या शक्यता तपासून पाहिल्यानंतर फेर तपासणी करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी उपोषणकर्त्या कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिले.
कोत्रेवाडी येथे वस्तीलगत नगरपंचायतीने मनमानी कारभार करून लादलेला घनकचरा प्रकल्प रद्द होण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे उपोषण छेडण्यात आले होते होते. सकाळपासूनच प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता हे उपोषण लोकशाही पद्धतीने शांततेत सुरू होते. यापूर्वी प्रशासनांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडचा साक्षणिक उप प्रस्ताव विद्यमान नगरपंचायत्तीने ठराव घालून रद्द करावा आणि तो अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा तसेच रस्ता नसतानाही तो उपलब्ध करून देऊ असे सांगणार्या जमीन मालकांकडून पैशांची रिकवरी लावावी अशा दोन मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबत तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषण व करण्याचा निर्णय घेतला होता.




