
आमदारांचे सचिव, वाहनचालकांच्या मानधनात १० हजारांची वाढ!
मुंबई : विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मानधनातील ही वाढ १ ऑगस्ट पासून लागू करण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार आमदारांच्या पीएंचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये झाले आहे. जवळपास चार वर्षांनंतर ही मानधनवाढ करण्यात आली आहे. संसदीय कार्य विभागाने आज मानधन वाढीबाबतचा शासन निर्णय जारी केला.
महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम, १९५६ मधील तरतुदींनुसार विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी पीएची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. विधानमंडळ सदस्यांच्या वेतन आणि भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार पीएच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.




