
सोनगाव ग्रामस्थांचा २७ जुलै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर मोर्चा
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यामुळे सोनगाव ओढ्याचे प्रदूषण झाल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दोषी कारखान्यांवर प्रत्यक्ष कारवाईच्या मागणीसाठी २७ जुलै रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) उपप्रादेशिक कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
७ जुलै रोजी लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोनगाव ओढ्यात मिसळल्याने नदीचे पाणी दुधासारखे पांढरे झाले होते. या घटनेमुळे शेती, जलस्रोत आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यावेळी एमपीसीबीने संबंधित सहा कारखान्यांना कामबंदच्या नोटिसा बजावल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात कारखाने सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर दोषी कारखान्यांवर प्रत्यक्ष कारवाई करावी, नुकसानग्रस्त शेतकरी व मच्छीमारांना तातडीने भरपाई द्यावी तसेच प्रदूषित पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल त्वरित जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे.
या मोर्चात पंचायत समिती सदस्या रेवती घाग, सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलिंद घोरपडे यांच्यासह राजेंद्र घाग, विष्णू साळुंखे, संदीप घाग, प्रथमेश घाग, दिलीप दिवेकर, शशिकांत गमरे, विनायक घाग, शेखर मोरे, भावेश घाग, सुभाष घाग, दिलीप घाग, महेंद्र घोरपडे, योगेश घाग, प्रमोद माळी, रविंद्र खेराडे, प्रमोद आदवडे, शंकर आदवडे, संजय खेराडे, सदानंद गोटळ, रमेश घाग, विष्णू घाग, नितीन पवार, सौरभ सैतवडेकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.




