
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील बेपत्ता महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथील बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डिंगणी येथील खाडीपात्रात आढळून आल्याची घटना समोर आली आहे. अंजनी अर्जुन वेद्रे (५४, रा. परचुरी वेद्रेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परचुरी गावावर शोककळा पसरली आहे.
मुलाचे लग्न जुळत नसल्यामुळे वेद्रे या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. २६ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत त्या घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्या. बराच शोध घेऊनही त्या सापडल्या नसल्याने त्यांचे पती अर्जुन यशवंत वेद्रे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
डिंगणी हद्दीतील खाडीपात्राच्या काठालगत एक मृतदेह अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख अंजनी वेद्रे अशी पटविली. ही माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डिंगणी उपक्षेत्राचे तपासिक अंमलदार अरुण बी. वानरे व त्यांच्या पथकाने पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.




