
दापोली तालुक्यातील गोवा किल्ल्याच्या संवर्धनावर पावसाचा घाला
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा तालुक्यातील हर्णे येवाल ऐतिहासिक गोवा किल्ल्यालाही मोठा फटका बसला आहे. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या किल्ला संवर्धनाच्या कामातील नव्याने उभारलेल्या तटबंदीचा मोठा भाग कोसळल्याने शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंतिम टप्यात आलेल्या किल्ला संवर्धनाच्या कामावर अक्षरशः पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अरबी समुद्राच्या किनार्यावर उभा असलेला गोवा किल्ला हा मराठा आरमाराचा इतिहास सांगणारा महत्वाचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी सामथ्याची साक्ष देणार्या या किल्ल्याचे संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याला पुन्हा ऐतिहासिक वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच गेल्या आठवड्यात पावसाने सर्व गणित बिघडवले. मुसळधार पावसामुळे माती खचल्याने आणि पाण्याचा मोठा मारा झाल्याने नव्याने उभारलेला तटबंदीचा काही भाग कोसळला. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.




