
उद्धव सेनेचे अमोल कानडे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेशआमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; संघटना बळकट करण्याचे आवाहन
राजापूर : राजापूर तालुक्यातील उद्धव सेनेचे कार्यकर्ते अमोल कानडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी अमोल कानडे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच राजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, सुयोगा जठार, अनिल करंगुटकर, स्वाती करंगुटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस हातभार लागेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




