
गणपतीपुळे दुर्घटना; आणखी दोघांचे मृतदेह सापडले, मृतांची संख्या तीनवर दोघांचा अद्याप शोध सुरू
गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील आणखी दोघांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरा सापडले. यश कांबळे आणि अनिकेत हिवराळे यांचे मृतदेह शोध पथकाला आढळून आले. यापूर्वी प्रेम आदमाने याचा मृतदेह रविवारी सायंकाळी सापडला होता. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील 19 पर्यटकांचा गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. यापैकी पाच जण समुद्रात उतरले असता ते पाण्याच्या प्रबळ प्रवाहात अडकले. या घटनेनंतर प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली.
दरम्यान, आदित्य राऊत आणि आनंद नरवडे हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. समुद्रातील प्रबळ प्रवाह, भरती-ओहोटी आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडचणी येत असल्या तरी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आली आहे.
बेपत्ता दोघांचा शोध लागेपर्यंत सर्व यंत्रणा घटनास्थळी कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




