
सोमेश्वर येथे पुलावरून उडी घेऊन विवाहितेने जीवनयात्रा संपवली
रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे एका विवाहित महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (१३ जून) दुपारी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, महिलेने पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रमिजा इफ्तिकार हुश्ये (वय ३८, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.
दरम्यान, सोमेश्वर येथील पुलावर महिलेची ओढणी व चप्पल आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.
शोधमोहीमेदरम्यान काही वेळाने नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.
महिलेने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून, पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू आहे.




