
सावंतवाडीत मदतीसाठी फिरणाऱ्या तीन काश्मिरी नागरिकांची पोलिसांकडून चौकशी
सावंतवाडी शहरातील भटवाडी-काजरकोंड परिसरात घराघरांत जाऊन मदतीसाठी आर्थिक सहाय्याची मागणी करणाऱ्या तीन काश्मिरी नागरिकांची सावंतवाडी पोलिसांनी चौकशी केली. पडताळणीनंतर संबंधित नागरिकांविरोधात कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने त्यांना समज देऊन परत पाठविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, भटवाडी-काजरकोंड परिसरातील एका घरात दोन पुरुष आणि एक युवती अशा तिघांनी जाऊन आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यांची ओळख स्थानिकांना नसल्याने काही नागरिकांनी याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे रहिवासी असल्याचे समोर आले.
त्यांच्या ओळखीची खातरजमा करण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी संबंधित भागातील पोलिस यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली. पडताळणीअंती तिघांची माहिती योग्य असल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही गैरकृत्याची नोंद अथवा संशयास्पद बाब आढळून न आल्याने त्यांची नोंद घेऊन त्यांना परत पाठविण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी नागरिकांना कोणतीही अफवा न पसरविण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.




