
“संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा – २०२६” उपक्रम उत्साहात संपन्न
"विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे."
रत्नागिरी:
एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन, रत्नागिरी (महाराष्ट्र) यांच्या वतीने राबविण्यात येणारा “संकल्प शैक्षणिक दातृत्वाचा – २०२६” हा सामाजिक उपक्रम आज दिनांक २९ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा, वाटद-मिरवणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमांतर्गत शाळेतील ७ गरजू, आर्थिकदृष्टया दुर्बल व होतकरू विद्यार्थिनींचे संपूर्ण शैक्षणिक पालकत्व असोसिएशनने स्वीकारले. या विद्यार्थिनींना सन २०२६-२०२७ या संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. तसेच शाळेतील उर्वरित ३८ विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे या हेतूने त्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.
केवळ शैक्षणिक साहित्य देऊन थांबणे हा आमचा उद्देश नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील दोन वर्षांपासून असोसिएशनतर्फे विशेष प्रयत्न सुरू आहेत. सामान्यज्ञान, बुद्धिमापन व विचारशक्ती वाढविणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे वर्गखोलीतच छोटे-छोटे खेळ आयोजित करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येतात. मोबाईलच्या वाढत्या प्रभावाच्या युगात मुलांनी प्रत्यक्ष खेळांमधून शिकावे, एकमेकांशी संवाद साधावा आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी असोसिएशनच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. तसेच भविष्यात शाळेच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सहकारी मित्र तसेच दानशूर व्यक्तींनी विशेष परिश्रम घेतले. विशेषतः समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व दात्यांप्रती असोसिएशन कृतज्ञता व्यक्त करते.
आज दिलेली ही छोटीशी मदत उद्याच्या उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरो, हीच सदिच्छा!
शिक्षणाची ज्योत तेवत ठेवूया… गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊया!




