
शीळ धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर घसरला, रत्नागिरीवर ’एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याचे संकट
मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असताना रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या शीळ धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर घसरला आहे. धरणात केवळ ०.५८ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, नागरिकांवर आता ’एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार लटकू लागली आहे.
रत्नागिरी शहराची दैनंदिन पाण्याची गरज १९ ते २० दशलक्ष लिटर इतकी आहे. उपलब्ध साठा पाहता हा पाणीसाठा जास्तीत जास्त १५ ते २० दिवसांपुरताच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणीकपात केली जात असली तरी पावसाचे आगमन आणखी लांबल्यास हे नियोजन अपुरे ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने ’एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार सुरू केला आहे.
प्रस्तावित नियोजनानुसार शहराचे दोन विभाग करून आलटून-पालटून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास धरणातील ०.५० दशलक्ष घनमीटर मृत साठा (डेड स्टोरेज) वापरण्याची वेळ येऊ शकते. मात्र, या पाण्याची गुणवत्ता वेगळी असल्याने हा पर्याय प्रशासनाने शेवटचा उपाय म्हणून राखून ठेवला आहे. पाणी पुरवठा समितीचे सभापती निमेश नायर यांनी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत प्रत्यक्ष शीळ धरणाची पाहाणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य संकटावर उपाययोजना आखण्यासाठी संबंधित अधिकार्याशी सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पावसाची प्रतीक्षा कायम असताना पालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाण्याचा वापर टाळून उपलब्ध साठा जपणे ही सध्या काळाची गरज असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.www.konkantoday.com


