
स्वच्छतेसाठी अधिभारातून दिवसाला एसटीचा कोटींचा गल्ला; तरीही एसटी बस आगारांची अस्वच्छता कायम, पावसाळ्यात नरकयातना!
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १ जूनपासून राज्यव्यापी स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यासाठी प्रवाशांकडून दोन रुपये अधिभार आकारला जातो.
दररोजच्या ५० लाख प्रवाशांकडून एक कोटी रुपये केवळ स्वच्छतेसाठी जमा होतात. राज्यभरातील ५६० हून अधिक बस आगार, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर आणि एसटी बसांची नियमित स्वच्छता करण्याचे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अनेक आगारातील परिस्थिती पूर्वीसारखी आहे. पावसाळ्यात ही दुरावस्था आणखी वाईट झाली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या दररोज सुमारे १४ हजार बस रस्त्यावर धावतात. जवळपास ५० लाख प्रवासी दररोज एसटीने प्रवास करतात. डेपो आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी महामंडळ प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा अधिभार आकारते. या माध्यमातून एसटीला सुमारे एक कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. हा निधी ज्या उद्देशाने गोळा केला जातो, त्या प्रमाणात प्रवाशांना स्वच्छतेचा लाभ मिळत नाही. पावसाळ्यात या स्वच्छतेची तीन तेरा वाजले आहेत.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही स्वच्छता चांगली व्हावी यासाठी संसद सारखी उच्च दर्जाची वास्तू स्वच्छ करणाऱ्या कंपनीच्या उपकंपनीला हे काम देण्यात आले आहे.




