वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्ट मधील जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू


छोट्या जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारणे सांगलीच्या युवा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना वायरी (ता. मालवण) येथील एका रिसॉर्टमध्ये (श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, रा. ईश्‍वरपूर, ता. वाळवा; मूळ रा. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. जलतरण तलावामध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील १० मित्र शनिवारी पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते, ते वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले होते. दुपारी काही मित्र खोलीत होते, तर काही मित्र पोहण्याचा आनंद लुटत होते.

छोट्या जलतरण तलावामध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटांच्या भागामध्ये श्रेणिक याने आठ ते दहा फुटांवरून उडी घेतली. त्याची उंची कमी असल्याने त्याची उडी थेट पुलाच्या तळाशी जाऊन त्याचे डोके आपटले. यात डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सहकारी मित्रांनी तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. श्रेणिक हा अविवाहित होता. दुर्घटनेची माहिती दिल्यानंतर त्याचे वडील व अन्य कुटुंब रात्री मालवणमध्ये दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button