
रिव्हर्स घेताना डंपर दरीत कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू
खेड तालुक्यातील सुकवली-क्रशर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात खडी वाहतूक करणारा डंपर सुमारे ३० ते ३५ फूट खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०८ डब्ल्यू ८४७१ क्रमांकाचा डंपर खडी वाहतूक करत असताना सकाळी सुमारे ११.४० वाजण्याच्या सुमारास सुकवली-क्रशर परिसरात रिव्हर्स घेत होता. यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि डंपर थेट दरीत कोसळला.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र डंपर मोठ्या उंचीवरून खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
या दुर्घटनेमुळे सुकवली परिसरात शोककळा पसरली असून मृत चालकाची ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.



