
दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेला राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार जाहीर!
३०१ ते ५०० कोटी रुपये ठेवी गटात राज्यात तृतीय क्रमांक; सलग दुसऱ्या वर्षी मानाचा सन्मान
चिपळूण : सहकार क्षेत्रातील कोकण विभागातील अग्रगण्य असलेल्या दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., चिपळूणने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे देण्यात येणारा सन २०२५-२६ चा राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार चिपळूण अर्बन बँकेला जाहीर झाला आहे. ३०१ ते ५०० कोटी रुपये ठेवी असलेल्या बँकांच्या गटात चिपळूण अर्बन बँकेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला असून, सलग दुसऱ्या वर्षी हा मानाचा पुरस्कार बँकेच्या नावे झाला आहे.
दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे दरवर्षी सहकारी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यंदा ३०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक ते ५०० कोटी रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून चिपळूण अर्बन बँकेने तृतीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी दिली.
बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची राज्यस्तरावर दखल घेत सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेचे सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेने जपलेली आर्थिक व प्रशासकीय शिस्त, ग्राहकांचा दृढ विश्वास तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मिळणारी तत्पर सेवा यामुळे हा बहुमान प्राप्त झाल्याची भावना बँकेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. या यशाचे श्रेय बँकेच्या सर्व सभासद आणि ग्राहकांना देण्यात आले आहे.
या मानाच्या पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता एक्सप्रेस इन हेरिटेज, जालना रोड, केंब्रिज स्कूलसमोर, सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. फेडरेशनच्या वतीने बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापनाला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू तसेच संचालक मंडळातील सदस्यांनी बँकेचे सभासद आणि ग्राहकांचे आभार व्यक्त केले आहेत. या पुरस्कारामुळे सहकार क्षेत्रात चिपळूण अर्बन बँकेचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत झाला असून, बँकेच्या पुढील वाटचालीस नवे बळ मिळाले आहे.
..




