
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची सभा उत्साहात
रत्नागिरी : जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची महत्त्वपूर्ण सभा कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघ, कुवारबाव यांच्या कार्यालयात नुकतीच उत्साहात झाली. सभेचे आयोजन समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
सभेच्या सुरुवातीला कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. आंब्रे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर समन्वय समिती रत्नागिरीचे उपाध्यक्ष श्री. आंब्रे यांनी प्रार्थना म्हटली व दीपप्रज्वलन करून सभेची रीतसर सुरुवात करण्यात आली.
सभेच्या पहिल्या सत्रात रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह श्री. पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले, ज्याला सर्व उपस्थितांनी सर्वानुमते मंजुरी दिली. त्यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित केले, ज्यावर अध्यक्ष श्री. थरवळ यांनी समर्पक चर्चा करून योग्य मार्गदर्शन केले.
या सभेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या योजनांविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली. महामंडळातर्फे N.C.M.C. कार्ड योजनेसाठी ‘EPIC INDIA’ या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी माहिती दिली की, वय वर्ष ६५ पेक्षा जास्त असलेल्या आणि वय वर्ष ७५ पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक कार्ड’ देण्याचे ठरले आहे. जर ज्येष्ठ नागरिकांकडे हे विशेष कार्ड नसेल, तर त्यांना प्रवास भाड्यात मिळणारी सवलत मिळणार नाही, असे प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
या प्रसंगी ‘सेवानिवृत्तांची जनसेवा समिती, रत्नागिरी’ यांच्यातर्फे कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाला कार्यालयातील टेबलासाठी लागणारे ‘टेबलक्लॉथ’ भेट म्हणून देण्यात आले. जनसेवा समितीचे अध्यक्ष श्री. झगडे यांच्या हस्ते हे टेबलक्लॉथ कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. आंब्रे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
सभेच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे ‘पसायदान’ म्हटले आणि अत्यंत उत्साही व कौटुंबिक वातावरणात या सभेची सांगता झाली.




