
रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट
रत्नागिरी : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून रत्नागिरीसह कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर तसेच राज्यातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ऑरेंज किंवा रेड अलर्ट अद्याप कोणत्याही जिल्ह्यासाठी जारी केला नसून राज्यातील बहुतांश भागांमध्ये यलो अलर्ट लागू आहे. हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि वीज पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्या जागेत थांबणे टाळावे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.




