रत्नागिरीत भटक्या श्वानाचा अमानुष छळ; अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल

प्राणीप्रेमींकडून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त

रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला रस्त्यावर एका निष्पाप भटक्या श्वानाचा अत्यंत अमानुष आणि क्रूरपणे छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने या मुक्या प्राण्याचे दोन्ही डोळे फोडून, डोक्यावर टोकदार वस्तूने वार करत त्याचा पाय तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात रत्नागिरीतील एका प्राणीमित्राने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार, ६ जून रोजी संध्याकाळी ५.३० ते ते ७ जून रोजी सकाळी १०.०९ वाजण्याच्या दरम्यान पेठकिल्ला रोडवरील पाथरे बागेच्या बाजूला असलेल्या नाईक कंपनीसमोर हा क्रूरतेचा कळस घडला. कोणातरी अज्ञात नराधमाने एका भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले, ज्यामुळे त्याचा एक डोळा थेट बाहेर आला होता. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने कुत्र्याच्या डोक्याच्या वरील भागात कोणत्यातरी टोकदार वस्तूने गंभीर वार केले, त्याचे दोन्ही मागचे पाय एकत्र बांधले आणि मागचा डावा पाय तोडून टाकला. या अत्यंत वेदनादायी आणि गंभीर दुखापतीमुळे तो मुका प्राणी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
हा क्रूर प्रकार परिसरातील रहिवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच प्राणी मित्राला फोन लावत याबाबत कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेची चौकशी केली आणि शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(A) आणि ११(१)(I) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे रत्नागिरीतील प्राणिप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button