भोस्ते घाटात क्रेनचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी सकाळी अवजड क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने अपघाताची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत क्रेन थेट दुभाजकावर (डिव्हायडर) चढवल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईकडे निघालेली जीए-15 एसपी-24 क्रमांकाची अवजड क्रेन भोस्ते घाटातील तीव्र उतारावर आली असता तिचे ब्रेक अचानक निकामी झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने धाडसाने वाहनावरील नियंत्रण राखत क्रेन दुभाजकावर चढवली. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना धडक बसण्याचा धोका टळला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. नंतर संबंधित यंत्रणेने क्रेन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button