पांगरे येथे मोठा अनर्थ टळला; दरीच्या काठावर अडकलेल्या वाहनातील सात भाविक सुखरूप


राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सात भाविकांचे प्राण थोडक्यात बचावले. पुण्यावरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची चारचाकी गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळण्याच्या बेतात असताना दाट झुडपे आणि रानवेलींचा आधार मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली.

माहितीनुसार, पुणे येथील काही भाविक पांगरे येथील स्वामी शिवानंद टेबे महाराज मठात दर्शनासाठी आले होते. दर्शन आणि समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान ते परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी पांगरे पुलाजवळ उभी असलेली त्यांची चारचाकी गाडी सुरू करताना हँडब्रेक योग्यरीत्या लावलेला नसल्याने वाहन अचानक मागे सरकू लागले.

वाहनाच्या मागे खोल दरी असल्याने काही क्षणांतच गाडी दरीच्या दिशेने घसरली. वाहनाचा मोठा भाग दरीकडे झुकला होता. मात्र, सुदैवाने दरीच्या कडेला असलेल्या दाट झुडपांमध्ये आणि रानवेलींमध्ये गाडी अडकून राहिल्याने ती खाली कोसळली नाही.

घटनेच्या वेळी वाहनात सात जण प्रवास करत होते. प्रसंगावधान राखत सर्वांनी पुढील दरवाजातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. वाहनातून बाहेर आल्यानंतर गाडीची स्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही इंचांचा फरक पडला असता तर वाहन थेट दरीत कोसळून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने सर्व भाविक सुखरूप बचावल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button