
मुंबईत वर्षाकाठी २० हजार गर्भपात; २५ ते ३४ वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक!
मुंबई : शहरात मागील तीन वर्षांच्या तुलनेत गर्भपाताच्या घटनांमध्ये सुमारे पाच हजारांनी घट नोंदविली असली, तरी दरवर्षी २० हजारांहून अधिक महिलांना गर्भपाताचा सामना करावा लागत आहे. गर्भपाताचे प्रमाण २५ ते ३४ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळत असताना, १९ वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताच्या घटनाही चिंतेचा विषय ठरत आहेत. गर्भनिरोधक साधनांचा अपुरा किंवा चुकीचा वापर तसेच गर्भनिरोधक निष्फळ ठरणे ही गर्भपातामागील प्रमुख कारणे असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघडकीस आले आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत गर्भपाताचे प्रमाण कमी झाले असले तरी एकूण संख्या अद्याप मोठी आहे. वैद्यकीय कारणांमुळे करण्यात आलेले गर्भपात तसेच नैसर्गिक गर्भपात या दोन्ही प्रकारांचा यात समावेश आहे. गर्भपाताचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमांचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येत असला, तरी गर्भपाताची वार्षिक संख्या अद्यापही लक्षणीय असल्याचे चित्र आहे.
गर्भनिरोधक पद्धतीतील त्रुटी ठरत आहेत कारणीभूत
१. बहुतांश गर्भपात गर्भनिरोधक साधनांचा योग्य वापर न होणे किंवा त्यांचे अपयश यामुळे होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
२. २०२३-२४ मध्ये अशा कारणांमुळे २२ हजार १४९ महिलांनी गर्भपात केला होता. ही संख्या २०२४-२५ मध्ये १९ हजार ४९५ इतकी होती, तर २०२५-२६ मध्ये १८ हजार ९६६ महिलांना अशा कारणांमुळे गर्भपात करावा लागला.
अल्पवयीन मुलींमधील गर्भपात चिंतेचा विषय
एकूण गर्भपाताच्या संख्येत घट झाली असली, तरी १९ वर्षांखालील मुलींमधील गर्भपाताच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. २०२३-२४ मध्ये या वयोगटातील ३३३ मुलींनी गर्भपात केला होता. पुढील वर्षी ही संख्या वाढून ७१६ वर पोहोचली. मात्र २०२५-२६ मध्ये त्यात पुन्हा घट होऊन ३६५ प्रकरणांची नोंद झाली.




