
ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून माळनाका येथील स्काय वॉकचे रूपांतर ’हँगिंग आर्ट गॅलरी’त होणार
रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि कला क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम लवकरच रत्नागिरीत साकारला जाणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून माळनाका येथील स्काय वॉकचे रूपांतर ’हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये करण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या उद्देशाने काही वर्षांपूर्वी माळनाका येथे स्काय वॉक उभारण्यात आला होता. मात्र, अपेक्षित प्रमाणात त्याचा वापर होत नक्मल्याने या जागेचा अधिक उपयुक्त आणि आकर्षक पद्धतीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावित हँगिंग आर्ट गॅलरीमध्ये विविध थोर व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील कलाकृती, तसेच स्थानिक आणि नामवंत कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना चालता-बोलता कला अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमामुळे नवोदित कलाकारांनाही आपली कला प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कला, संस्कृती आणि पर्यटन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प रत्नागिरीच्या सांस्कृतिक ओळखीत भर घालणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्काय वॉकचा मूळ उद्देश कायम ठेवत त्याचबरोबर तेथे कलादालन उभारण्यात येणार असल्याने नागरिकांना सुरक्षित पादचारी मार्गासोबतच कलात्मक अनुभवही घेता येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com




