
चाकरमानी परतू लागले, मात्र परतीच्या प्रवासातही रखडपट्टी अन् रेटारेटीच
उन्हाळी सुट्टीचा हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. गावी आलेले कोकणवासिय परतीच्या प्रवासाला निघाल्याने सर्व रेल्वेस्थानके हाऊसफुल्ल झाले आहेत. रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांची कुमक त्या त्या स्थानकात तैनात करण्यात आली आहे. ’सिंगल ट्रॅक’ अन् उन्हाळी सुट्टीच्या फेर्या यामुळे परतीच्या प्रवासातही रखडपट्टी अन् रेटारेटीच्या प्रवासाची ’विघ्न’ उभे ठाकले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कसरतीचा प्रवास करण्याऐवजी कोकणवासिय रेल्वेगाड्यातूनच रेटारेटीचा अन् लोंबकळत प्रवास करत इच्छितस्थळ गाठण्यास पसंती देत आहेत.
कोकणवासियांच्या रेलचेलीने मार्गावरील सर्वच रेल्वेस्थानके गजबजली आहेत. कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल विक्रमी गर्दीनेच मार्गस्थ होत आहेत. त्या त्या स्थानकात दाखल होणार्या रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळवताना प्रवाशांची अक्षरशः चढाओढच सुरू झाली आहे.
बर्याचवेळा स्थानकात दाखल होणार्या गाड्यांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने तासन्तास स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान पुढे सरसावत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे. त्यांच्याच मदतीने प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये चढण्याची मुभा दिली जात आहे.www.konkantoday.com




