जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू; जिल्हा प्रशासनाचे युवकांना आवाहन


​रत्नागिरी, दि. १५ ): ‘जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६-२७’ साठी (WorldSkills Competition) जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर टप्प्याटप्प्याने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे परि. सहायक आयुक्त दत्ता दिनकर चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
​दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य गुणवत्तेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांसाठी हे कौशल्य सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ असून, या स्पर्धेला कौशल्याचे ‘ऑलिम्पिक’ म्हणून ओळखले जाते.
​स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ५६ वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल आणि विविध औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने ‘स्किल कॉम्पिटिशन’ आयोजित केले जाणार आहे. यामधून निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट उमेदवारांना पुढे जागतिक पातळीवर पाठवले जाईल.
​स्पर्धेसाठी वयोमर्यादेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
​सर्वसाधारण ५६ कौशल्य क्षेत्रे: उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा.
​टीम स्किल्स (Cyber Security, Industry 4.0, Mechatronics, Robot System Integration): उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा.
​इतर टीम स्किल्स (Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work, Landscape Gardening): उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असावा.
​इच्छुक उमेदवारांनी अधिकृत https://skillindiadigital.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, एमआयडीसी मिरजोळे, नाचणे, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button