राजापूर प्रांत कार्यालयातील सुनावणीत दबावतंत्राचा आरोप; सीसीटीव्ही व व्हिडिओच्या आधारे चौकशीची मागणी


राजापूर : रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात राजापूर प्रांत कार्यालयात बुधवारी झालेल्या सार्वजनिक सुनावणीनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. सुनावणीदरम्यान पाचल येथील काही व्यक्तींनी विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व प्रतिनिधींवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप रायपाटण ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सुनावणी निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित असताना काही व्यक्तींनी प्रांत कार्यालय परिसरात उपस्थित राहून रायपाटणच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी विविध गावांच्या प्रतिनिधींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून तो पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
तसेच, सुनावणीच्या दिवशीचे प्रांत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने सुरक्षित ठेवून त्याची पडताळणी करण्यात यावी, घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, सरपंच निलेश चांदे तसेच मनोज गांगण, संतोष गांगण, प्रसाद देसाई, मंगेश पराडकर, कुणाल गांगण, तात्या गांगण, विशाल गांगण, गोपीनाथ नवरे, जितेंद्र गांगण, निमेश बांबरकर आदींसह रायपाटण येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या तक्रारीमुळे रायपाटण येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावरील सुनावणीला नवे राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळाले आहे. प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन कोणती भूमिका घेते आणि चौकशीबाबत काय निर्णय घेतो, याकडे आता संपूर्ण राजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button