
चिपळूण शहरातील विरेश्वर तलावात अनधिकृत मासेमारीमुळे पर्यावरण धोक्यात
मासेमारीचे ठिकाण नसतानाही चिपळूण शहरातील विरेश्वर तलावात गेली तीन वर्षे मोठ्याप्रमाणात मासे मारण्याचे प्रकार घडत आहेत. तरीही नगर परिषद संबधितांचा शोध घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून त्यांच्या शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तलावांचे शहर अशी चिपळूणची ओळख आहे. त्यातील विरेश्वर तलावाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. विशेष म्हणजे विरेश्वर मित्र मंडळाने विकसित केलेले हे पहिले तलाव आहे. असे असताना नगर परिषद मात्र येथे भौतिक सुविधा देण्यासह तलावाची साफसफाई व अन्य कामांकडे कायम दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे हा तलाव कायम भकास वाटतो. असे असतानाच अनधिकृत मासेमारी हा या तलावाला लागलेला शाप आहे.
गेल्या तीन वर्षापासून अज्ञात व्यक्ती मासेमारीसाठी रात्रीच्यावेळी या तलावात पावडर टाकत असून त्यानंतर पहाटेच्यावेळी येऊन हे मासे नेले जातात. वर्षातून एकदाच हा प्रताप केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मरतात. तेवढे मासे जमा करण्यास तितकासा वेळ मिळत नसल्याने या व्यक्ती अन्य मासे तसेच ठेवून पळून जातात.
मेलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरल्यावर होणारी ओरड लक्षात घेता नगर परिषद कर्मचारी बोट घेऊन येथे दाखल होतात. हे मासे जमा करून ते कचरा प्रकल्पात नेऊन त्यांची विल्हेवाट लावली जाते. यावर्षी तर चक्क ७ पोती मासे मिळाले. त्यामुळे हा तलाव मासेमारीचे ठिकाण आहे काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
www.konkantoday.com




