कोकणातील २० हजार हेक्टर खारभूमी लागवडीखाली , मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती!


मुंबई : कोकणातील खारभूमीचे संरक्षण आणि शेतीयोग्य क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठे यश मिळाले असून, मार्च २०२६ पर्यंत २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

विधान परिषद सदस्य प्रविण दरेकर, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना कोकणातील खारभूमीच्या जमिनींचे होणारे नुकसान रोखण्यासाठी जिल्हानिहाय १६५ खारभूमी विकास योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. या योजनांद्वारे २२ हजार ५५८ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण व पुनर्स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३६ योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यामुळे २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा शेतीयोग्य झाले आहे.

कोकणातील खारभूमीच्या जमिनींचे होणारे नुकसान रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात मागील चार वर्षांत राज्य निधीतून २१ योजनांच्या नूतनीकरणासाठी ७६.२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ कामे पूर्ण झाली असून ५३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. उर्वरित ९ कामे अंतिम टप्प्यात असून त्याद्वारे २,०८२ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण होणार आहे.

याशिवाय, कोकण आपत्ती सौम्यीकरण कार्यक्रमांतर्गत २०२४ मध्ये १४ कामांसाठी ८६.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामेही अंतिम टप्प्यात असून त्यातून १,८९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित होणार आहे. तसेच २०२६ मध्ये राज्य निधीतून ५ नव्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत ९४ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button