पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान;पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सन्मान


*रत्नागिरी दि. १८ :- महाराष्ट्र पोलीस दलात १५ वर्षांची उल्लेखनीय, निष्कलंक आणि आदर्श सेवा बजावणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश आनंदराव पाटील यांना स्वातंत्र्यदिन २०२६ च्या औचित्याने “उत्कृष्ट सेवा पदक” देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणा, व्यावसायिक निष्ठा, कर्तव्यपरायणता आणि उत्कृष्ट तपास कौशल्याच्या जोरावर श्री. पाटील यांनी पोलीस दलाची प्रतिष्ठा उंचावत जनतेचा दृढ विश्वास संपादन केला आहे.
*विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास*
अविनाश पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत गुहागर, मुरबाड, कल्याण तालुका, कुळगाव, नेरळ आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा, मुंबई येथे विविध पदांवर सेवा बजावली आहे. या कार्यकाळात त्यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, घरफोडी, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विरोधी कारवाई आणि फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे यशस्वीरीत्या उघडकीस आणले. अनेक फरार, सराईत व आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांनी आतापर्यंत ११.५० कोटींहून अधिक किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उल्लेखनीय कामगिरी आणि पुरस्कार:
‘बेस्ट कन्व्हिक्शन अवॉर्ड’: कल्याण सत्र न्यायालयातील सत्र खटला क्र. ३८४/२०१६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून तीन वेळा ‘सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार’.
मोठ्या कारवाया: वापी (गुजरात) येथून ११.०८ कोटींचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत; दरोड्याच्या गुन्ह्यात ६ आरोपींना अटक करून ११० लाखांचा मुद्देमाल जप्त.
इतर तपासांमधील यश: फरार जन्मठेपेच्या कैद्याला जेरबंद करणे, सोनसाखळी चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणणे आणि बनावट अमेरिकन डॉलर्सच्या व्यवहाराशी संबंधित गुन्ह्यांचा छडा लावणे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धडक कारवाई
रत्नागिरी एसीबी युनिटमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी १४ यशस्वी सापळा कारवाया करून लाचखोरांचे धाबे दणाणले. यामध्ये महसूल विभाग, पोलीस, जिल्हा परिषद, बांधकाम, वैद्यकीय, पाटबंधारे, अन्न व नागरी पुरवठा, स्थानिक निधी लेखा शाखा आणि विशेष सहायक सरकारी अभियोक्ता या विविध विभागांतील लाचखोरांवर धडक कारवाई केली.
२३१ बक्षिसे आणि निष्कलंक सेवा
आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अविनाश पाटील यांनी २३१ बक्षिसे, पोलीस महासंचालकांचे प्रशंसापत्र आणि इतर १२ प्रशंसापत्रे मिळवली आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात कोणतीही शिक्षा अथवा प्रतिकूल नोंद नसलेला पूर्णतः निष्कलंक सेवा अभिलेख (Blemish-free Record) त्यांनी कायम ठेवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button