
गुहागरच्या समुद्रात मासेमारीला गेलेल्या चिपळूणमधील दोघांचा दुर्दैवी मृत्यू
चिपळूण : गुहागरच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जावेद सुर्वे आणि सलीम पटेल अशी मृतांची नावे असून, त्यांचे मृतदेह गुहागर तालुक्यातील बुदल समुद्रकिनारी आढळून आले. या घटनेमुळे गोवळकोटसह परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावेद सुर्वे आणि सलीम पटेल हे दोघे काल दुपारी मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दोघे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, आज सकाळी बुदल समुद्रकिनारी स्थानिक मच्छिमारांना दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गोवळकोट परिसरावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




