
मुंबई -गोवा महामार्गावरील समस्या सुरूच, खड्डे, भेगा अन् पुन्हा कॉंक्रीटीकरण
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे पनवेल-कन्याकुमारी महामार्गात रुपांतर झाले असले, तरी या मार्गावरील समस्यांचा सिलसिला काही थांबताना दिसत नाही. एकीकडे महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तर दुसरीकडे पूर्ण झालेल्या रस्त्याचीही वारंवार तोडफोड करून डागडुजी आणि पुन्हा कॉंक्रिटीकरण करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये नाराजी वाढत आहे.
पनवेल ते कन्याकुमारी हा सुमारे १६४० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी महामार्ग असून तो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक आणि केरळमार्गे तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत जातो. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अनेक भाग अद्याप अपूर्ण आहेत. काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे रखडली आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याची कामे पूर्ण झाल्याचा दावा असतानाही पुन्हा रस्ता खोदून दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे.




