
ओणी येथे दुचाकी-कार अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी येथील पेट्रोलपंपासमोर मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जियाऊलक रफिक अन्सारी (वय २७, रा. झारखंड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जियाऊलक अन्सारी हा दुचाकीवरून लांजाकडून राजापूरच्या दिशेने येत असताना ओणी येथील पेट्रोलपंपातून बाहेर पडणाऱ्या कारशी त्याची जोरदार धडक झाली. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की, अन्सारी याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर जखमी अन्सारी याला राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मृत जियाऊलक अन्सारी हा झारखंड राज्यातील रहिवासी असून राजापूर परिसरात एका बांधकाम ठेकेदाराकडे काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख, पोलीस कर्मचारी महेश जगताप व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ओणीचे पोलीस पाटील संजय लिंगायत, भाजप युवा कार्यकर्ते समीर शिंदे यांच्यासह आयान वाघू, गणेश लाड, विजय सुवरे यांनीही मदतकार्य व वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य केले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांना तसेच संबंधित ठेकेदाराला घटनेची माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.




