अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; ८ जणांवर गुन्हा दाखल!

गेल्या काही दिवसांपासून हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्रकरणात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली होती. त्यानंतर या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांमधील कथित गैरव्यवहार आणि देणगी चोरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने तपास पूर्ण करून उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल सादर केल्याची माहिती सांगितली जाते. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीनुसार, अयोध्या येथील पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांमधील कथित गैरव्यवहार आणि देणग्या चोरी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी, त्यांचा गैरवापर व अपहार केल्याचा आरोप या आठ जणांवर ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लखनऊ क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तसेच एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव असलेल्या व्यक्तींमध्ये राम शंकर यादव, लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा यांचा समावेश असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा हे मंदिरात देणगी स्वरूपात मिळालेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मोजण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी आहेत. तसेच राम शंकर यादव हे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे वाहनचालक होते आणि २०२२ मधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून ते मंदिराच्या व्यवस्थापनात सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button