सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोर्‍यात अलिकडेच दुर्मीळ वन्यजीवाचे दर्शन

कोकणच्या जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोर्‍यात अलिकडेच दुर्मीळ वन्यजीवाचे दर्शन झाले आहे. ’स्लेंडर लॉरिस’ (Sleder Loris), ज्याला स्थानिक भाषेत ’वनमानव किंवा ’लाजवंती’ म्हणून ओळखले जाते, तो नुकताच काही प्राणी अभ्यासकांच्या कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
सह्याद्रीच्या घनदाट जंगलात काही प्राणी अभ्यासकांना जंगल सफारी आणि वन्यजीवांचा अभ्यास करताना झाडांच्या फांद्यांमध्ये एका लहान, मानवी आकृतीशी साधर्म्य असलेल्या प्राण्याचे दर्शन झाले. बारकाईने निरीक्षण केल्यावर तो दुर्मीळ ’स्लेंडर लॉरिस’ असल्याचे स्पष्ट झाले. ते दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात वावरत आहेत.
’स्लेंडर लॉरिस’ अत्यंत लाजाळू असल्याने त्याला ’लाजवंती’ असेही म्हटले जाते. मानवी चाहूल लागताच, तो पानात किंवा फांद्यांमध्ये लपून बसतो. वनमानवाचा वावर प्रामुख्याने घनदाट जंगलात आणि अतिपावसाच्या प्रदेशात असतो. पश्चिम घाटातील सहयाद्री पट्टा हे याच्यासाठी पोषक वातावरण मानले जाते.
मोठे गोलाकार डोळे आणि लांब सडपातळ हात-पाय ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रात्रीच्या वेळी सक्रिय असणारा हा प्राणी कीटक आणि फळांवर आपली उपजीविका करतो. वनमानव हा प्राणी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार याचा समावेश ’शेड्यूल वन’ मध्ये करण्यात आला आहे. याचा अर्थ या प्राण्याला वाघ किंवा बिबट्याप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये अशा दुर्मीळ प्राण्याचे दर्शन होणे, हे येथील जंगलांचे आरोग्य उत्तम असल्याचे लक्षण आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button